ज्येष्ठ साहित्यिक डॉ.शंकर बोऱ्हाडे स्मृती लोककला पुरस्कार लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना जाहीर…!
लाल दिवा-नाशिक,ता.२२:-गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित पहिल्या अ.भा.शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लोककला अभ्यासक आणि समीक्षक डॉ.शंकर बोऱ्हाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा पहिला ‘डॉ.शंकर बोऱ्हाडे स्मृती लोककला पुरस्कार’ ख्यातनाम लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
रोख रक्कम रुपये अकरा हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून निवड समिती सदस्य प्राचार्य डॉ.प्रशांत पाटील, समीक्षक डॉ.भास्कर ढोके, डॉ.डी.एम.गुजराथी, वसंतराव खैरनार, श्रीकांत बेणी, संजय करंजकर, अरुण घोडेराव, किरण सोनार, संजय वाघ यांनी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर भारतीय स्तरावरील उत्कृष्ट लावणी नृत्यांगना आहेत. विशेषत: बैठकीच्या लावणीला महिला वर्गात लोकप्रिय करण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. १९९० मध्ये त्यांनी स्वतःचा तमाशा फड सुरू केला. त्यानंतर ‘नटरंगी नार’ हा लावण्यांचा कार्यक्रम त्यांनी सुरू करत देशविदेशातील रसिकांची मने जिंकली. पारावरच्या तमाशापासून प्रारंभ करत त्यांनी खऱ्या अर्थाने लावणी या लोककलेला चांगले वैभव प्राप्त करून दिले.
१३ आणि १४ जानेवारी रोजी मखमलाबाद रोडवरील भावबंधन मंगल कार्यालयात ज्येष्ठ साहित्यिक डॉ.शंकर बोऱ्हाडे साहित्य नगरीत संपन्न होणाऱ्या दुसऱ्या शेकोटी साहित्य संमेलनात सुरेखा पुणेकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे संयोजक हर्षवर्धन बोऱ्हाडे आणि गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी कळविले आहे. लोककला जागवणाऱ्या कलावंताला हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे.