भुजबळ भाजपमध्ये जाणार…..जरांगे पाटलांच्या राजकीय वक्तव्याने खळबळ…!
लाल दिवा-नाशिक,२३ : राज्यात मराठा आरक्षणासाठी काही महिन्यांपासून आंदोलन, मोर्चे सुरू आहेत. या मराठा आरक्षणाच्या वादावर ओबीसी नेते भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात दिवसेंदिवस वाद कमी होण्याऐवजी वाढू लागला आहे. दोन्ही नेते आपापल्या सभेत एकमेकांवर टीका करत आहेत. मात्र जरांगेंनी छगन भुजबळ हे भाजपमध्ये पलटी मारणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. या राजकीय वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगे हे आत्तापर्यंत मराठा आरक्षणावर बोलत असायचे मात्र आता त्यांनी राजकीय वक्तव्य करत भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले आहे. अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते.
- काय म्हणाले जरांगे-पाटील
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी भुजबळांचा आधीपासून विरोध आहे. हा विरोध लक्षात घेऊन मराठा आंदोलकांनी भुजबळ भाजपमध्ये पलट्या मारणार असल्याचे वक्तव्य केलं आहे. यावेळी जरांगे म्हणाले की, गृहमंत्री त्यांना काही म्हणत नाहीत. मराठा समाजाला त्रास देण्यासाठी त्यांना भाजपमध्ये पलट्या मारायच्या आहेत. देवेंद्र फडणवीस काहीच म्हणत नाहीत. यावर आम्ही शंका का घेऊ नये. भुजबळांना पलटी मारायची सवय आहे. त्यांनी आत्तापर्यंत दहा-पंधरा वेळा पलट्या मारल्या आहेत. मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी सरकारने भुजबळांना फुस लावली आहे. असे जरांगे म्हणाले आहेत.
- येवल्यातील मराठा समाजाचे होर्डिंग्ज फाडले
येवल्यात मराठा समाजाने मराठा आरक्षणाचे पोस्टर्स लावले होते. मात्र हे पोस्टर्स फाडल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे. यावर जरांगेंना विचारले असता जरांगे म्हणाले की, पोश्टर फाडले तर फाडू दे. यावरून कळतंय ना की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोण बिघडवत आहे. देवेंद्र फडणवीसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे हे त्यांनी सांगावे. अंबड येथे झालेल्या त्यांच्या सभेत आम्ही कोणतेही पोस्टर फाडले नाही. होर्डींग पोस्टर फाडल्याने आरक्षण घेण्यापासून थांबवेल का? हे फडणवीसांना कळायला पाहिजे.