अध्यात्माच्या नावाखाली कथावाचन करून समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रदीप मिश्रा यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी : अंनिस..
लाल दिवा -नाशिक ,या.२१ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना मागील ३५ वर्षांपासून देव-धर्म-अध्यात्माच्या नावाने समाजात अनेक अवैज्ञानिक व अनेक कालबाह्य रुढीं, प्रथां- परंपरा- कर्मकांडांच्या माध्यमातून चमत्काराचा दावा, बुवाबाजी- फसवणूक- शोषण- दिशाभूल करणाऱ्या भोंदुबुवांच्या विरोधात जनतेचे प्रबोधन व प्रशिक्षण करण्यासाठी व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी संघटीतपणे कार्यरत आहे.
संघटनेच्या पुढाराकाराने जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हे दोन कायदे महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच विधिमंडळाने पारीत करून लागू केलेले आहेत.
नाशिक मध्ये शिवमहापुराण कार्यक्रमात प्रदीप मिश्रा (सिहोर, मध्य प्रदेश) यांचे कथावाचन दिनांक २१ ते २५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे .
प्रदीप मिश्रा यांनी आतापर्यंत अध्यात्माच्या नावाखाली केलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये अनेक ठिकाणी असंवैधानिक, बेकायदेशीर व अवैज्ञानिक दावे केलेले आहेत, त्यांच्या ह्या दाव्यांची शहानिशा,तपासणी, चिकित्सा जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत करावी आणि मिश्रा यांच्यामार्फत अध्यात्माच्या नावाने समाजात पसरविल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा, बुवाबाजी त्यामुळे समाजाची होणाऱी दिशाभूल, फसवणूक, अपमानजनक, बदनामीकारक वक्तव्य याबाबत खातरजमा करून, प्रदीप मिस्त्रा यांच्यावर गुन्हे दाखल केले जावेत, आणि त्याआधारे नाशिक येथील त्यांचा होणारा संभाव्य कार्यक्रम रद्द करण्यात यावा , असे कार्यक्रमाच्या संयोजकांना व प्रदीप मिश्रा यांना तातडीने आदेश काढावेत, अशी मागणी करणारे निवेदन नाशिक जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त नाशिक शहर व पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण ) यांना महाराष्ट्र अंनिसच्या वतीने आज देण्यात आलेले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,
मध्यप्रदेशाच्या सिओर येथील रहिवासी असलेले प्रदीप मिश्रा उर्फ प्रभूराम रामेश्वर मिश्रा हे स्वतःला आंतरराष्ट्रीय कथाकार आणि पंडित म्हणवून घेतात आणि अध्यात्माच्या नावाखाली कथावाचनाचा व्यवसाय करतात.
समाजातील वाढती बेरोजगारी, महागाई ,दुष्काळ , वाढते पर्यावरण प्रदूषण,सामाजिक व आर्थिक विषमता , व्यसन, गुंडगिरी व अत्याचार अशा अनेक गंभीर व तातडीने सोडवायच्या समस्यांबद्दल प्रदीप मिश्रांसारखे अनेक तथाकथित अध्यात्मिक बुवा काहीही बोलत नाहीत. अध्यात्माच्या नावाने स्वतःचे उखळ पांढरे करून घेणारे असे भोंदूबुवा व्यवस्था परिवर्तनाबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. उलट त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे समाजात अनेक वेळा जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वाढत जाते.
प्रदीप मिश्रा यांनी पुराणकथा वाचनापेक्षा आपल्या दिव्य ज्ञानाचे व गंभीर आजारांवर दैवी व अवैद्यकीय तोडगे सांगण्याचे प्रदर्शन जास्त केलेले आहे, असे त्यांच्या आजपर्यंत झालेल्या कार्यक्रमाच्या उपलब्ध युट्युबवरून पडताळता येते . त्यामध्ये त्यांनी केलेले दावे आणि व्यक्त केलेली मतें ही भारतीय संविधान, त्याआधारे निर्माण झालेले कायदे-नियम, भारतातील महिला आणि युवक-युवती व समस्त श्रद्धावान हिंदू धर्मीय भक्तांचा अपमान करणारे तर आहेतच , शिवाय त्यांची दिशाभूल करून फसवणूक करणारे देखील आहेत. त्यांचे काही दावे पुढील प्रमाणे आहेत…
१). अभ्यास न करता विद्यार्थी पास होऊ शकतात,फक्त त्यांनी बेलाच्या पानावर मध लावून ते पान शिवलिंगाला चिकटवावे, मग अभ्यास करण्याची गरजच नाही , असा दावा ते करतात.
४) कोणाच्याही आणि कोणत्याही आरोग्य समस्येवरील उपचार म्हणून एक तांब्या पाणी,’ श्री शिवाय नमोत्सुत्ये ,’ असा मंत्र म्हणून वाहिल्यास सर्व प्रकारचे आजार बरे होतात, असा अशास्रीय व अवैद्यकीय दावा ते करतात.
३). महिलांनी केव्हा व कुठे स्नान करावे, कुठल्या घरात राहावे, ज्यामुळे त्यांचे आयुष्य सुखी- समाधानी होते, याचे भंपक मार्गदर्शन ते करतात.
४) लोकांच्या इतर श्रद्धास्थानांबद्दल ते अपमानजनक वक्तव्ये करतात.
५) यावर्षीच्या महाशिवरात्रीच्या कालावधीत चमत्काराने भारलेले रुद्राक्ष मोफत वाटण्याचा प्रचार- प्रसार करून मध्यप्रदेशातील शिओर येथे जमलेल्या भक्तांच्या अनियंत्रित गर्दीमुळे झालेले मृत्यू, चेंगराचेंगरी याची जबाबदारी ते झटकतात.
खरंतर, त्यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने भारताचे पंतप्रधान व गृहमंत्री यांना, ही घटना पत्राद्वारे कळविली होती आणि प्रदीप मिश्रा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबद्दल विनंती केली होती.
7. भारतीय संविधान बिनकामाचे, निरुपयोगी आहे, असा आक्षेप ते घेतात.
8. त्यांच्या दाव्यांना, आरोपांना, आक्षेपांना प्रश्न विचारणाऱ्या व त्याची चिकित्सा करू इच्छिणाऱ्या लोकांना ते धर्म विरोधी व राष्ट्रद्रोही म्हणून बदनाम करीत असतात.
वरील सर्व बाबी ह्या केवळ शाब्दिक वक्त्यव्य नसून त्या बाबतच्या वक्तव्यांचे पुरावे त्यांच्या यूट्यूबवर आजही उपलब्ध आहेत. तेच प्रदीप मिश्रांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यास, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास व अध्यात्माच्या नावाखाली पुढील त्यांचे बेजबाबदार, बेकायदेशीर वर्तन थांबविण्यास महत्वाचे दस्ताऐवज असणार आहे. याची आपण तपासणी करावी. चिकित्सा करावी आणि
प्रदीप मिश्रांच्या विरोधात महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३, मेडिकल प्रॅक्टशीनर अॅक्ट, महाराष्ट्र बोगस डॉक्टर विरोधी कायदा, ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमेडिज अॅण्ड अॅडव्हरटाईजमेंट ऑब्जेक्शन अॅक्ट ,१९५४ यासह भारतीय दंड संहिता (आयपीएस) आणि भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कायद्यांतर्गत स्त्री दाक्षिण्याचा अपमान, राष्ट्रीय व सामाजिक प्रतिके-प्रतिमांचा अपमान, हिंदू धर्मियांच्या भावना दुखविण्याचा व फसवणूक करण्यासह आर्थिक आणि मानसिक दिशाभूल करण्याबाबतच्या उपलब्ध कायदे- निमयमांचा वापर करून गुन्हे दाखल केले जावेत, अशी मागणी निवेदनात अंनिसच्या वतीने करण्यात आलेली आहे.
शिव महापुराण कथा किंवा तत्सम कार्यक्रम- उत्सव करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानातील कलम २५ नुसार भारतीय नागरिकांना जरूर दिले आहे. त्यासोबतच कलम २६, २७ नुसार त्यांच्यावरील नियंत्रण, बंधने, मर्यादा देखील नमूद केलेल्या आहेत. त्याचे पालनही संबंधितांनी करणे आवश्यक आहे असेही अंनिसचे म्हणणे आहे.
त्यामुळे राजकीय दबावाखाली जर हा कार्यक्रम झालाच तर त्या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग जिल्हाधिकारी यांच्या यंत्रणेमार्फत करण्यात यावे व ते सामान्य लोकांसाठी जाहीरपणे प्रसारित करावे. अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे
तसेच या कार्यक्रमामुळे सार्वजनिक नितीमत्ता, कायदा- सुव्यवस्था, सार्वजनिक व राष्ट्रीय व्यापक हित बाधित होणार नाही याची सर्वतोपरी जबाबदारी या कार्यक्रमाचे आयोजक व कथाकारांवर असल्याची लेखी सूचना ,आदेश त्यांना तातडीने दिले जावेत.
सूचना व आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी संबंधितांकडून होते की नाही, याबाबत दक्षता घेतली जाणे ही पूर्णतः नाशिक जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. जिल्हा अधिकारी यांनी
आयोजकांना देखील प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून वर उल्लेखित बाबींप्रमाणे लेखी स्वरूपात सूचना व आदेश काढावेत अशी *मागणी आज उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे.*
निवेदनावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सदस्य प्रा.डाॅ. सुदेश घोडेराव, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अधिक माहितीसाठी : डाॅ गोराणे.
+919420827924