आई-वडील प्रेम करत नाही म्हणून घर सोडणाऱ्या सोलापूरच्या सख्ख्या चुलत बहिणींना नाशिक पोलिसांनी शोधले…!
लाल दिवा -नाशिक,दि.२ : आई, वडील प्रेम करत नाहीत, शाळेतसुद्धा जाऊ देत नाहीत म्हणून मनात राग धरत दोन्ही सख्ख्या बहिणी आपल्या एका चुलत बहिणीला घेऊन सोलापुरातून थेट नाशकात येऊ धडकल्या होत्या. या सख्ख्या चुलत – बहिणी सोबत साडे सात लाखांची रोकड, तीन तोळ्यांचे दागिने घेऊन त्या मुंबई नाका येथे उतरल्या. तेथून त्यांनी जुने सिडको गाठून तेथे भाड्याने खोली घेण्याचा शोध सुरू केला होता. मुलींच्या वर्णनाबाबतची माहिती सोलापूर पोलिसांकडून प्राप्त झाल्याने गुन्हे शाखा युनिट -२च्या पथकाने गोपनीय माहितीवरून तिघींना
राणाप्रताप चौकातून शोधून काढले.
बुधवारी (दि. २७) सलगरवस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन मुली अचानकपणे बेपत्ता झाल्याची घटना घडली. याबाबत मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेथे गुन्हा दाखल करण्यात आला. तीनही मुलींच्या छायाचित्रांवरून पोलिसांनी वर्णन विविध जिल्ह्यांतील शहर, ग्रामिण पोलिसांना पाठविले होते. दरम्यान, नाशिक शहरातील मुंबई नाका येथे त्या तिघी मुली बसमधून उतरल्या. तेथून तिघींनी जुने सिडको गाठले. या मुलींकडे मोबाइलही नव्हते.
गुन्हे शाखा युनिट २ चे कर्तव्यदक्ष हवालदार गुलाब सोनार, चंद्रकांत गवळी यांना याबाबतची माहिती मिळाली. कुठलाही पुरावा हाती नसताना केवळ वर्णनावरून सोनार, गवळी यांनी तपास सुरू केला. एका गुप्त बातमीदाराकडून त्यांना तीन अनोळखी मुली राणाप्रताप चौकात भाडेतत्त्वावर घर शोधत असल्याची माहिती मिळाली. याबाबत सोनार यांनी त्वरित वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलवडे यांना कळविले. गणपती विसर्जनाचा बंदोबस्त असतानाही प्राधान्याने या मुलींचा शोध घेण्याबाबत नलवडे यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रथम प्राधान्य देत आदेशित केले होते.
औदुंबर बस थांबा परिसरात तिन्ही मुली घर शोधत वावरत होत्या. पोलिसांनी त्या मुलींना विश्वासात घेत
वाहनातून अंबड पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आई, वडील आपल्यावर प्रेम करत नाहीत, तसेच शाळेतसुद्धा जाऊ देत नाहीत, म्हणून त्यांनी रागाच्या भरात घर सोडले होते, अशी माहिती पोलिसांना दिली. अंबड पोलिसांनी सोलापूर पोलिसांशी संपर्क साधून तीनही मुली सुखरूप असल्याचे कळविले. सोलापूर पोलिसांनी नाशिक मध्ये येऊन या मुलींना ताब्यात घेत सोलापूर गाठले
सोलापूर पोलिसांनी नाशिक पोलीस गुन्हे शाखा युनिट २ चे आभार मानले