एकीकडे महिला आरक्षण विधेयक मंजूर होत असताना दुसरीकडे नाशिक मधील एका महिला कर अधिकाऱ्यास पाच हजार रुपयाची लाच घेताना अटक….!
लाल दिवा -नाशिक,ता.२० : बंद कंपनीचा व्यवसाय कर रद्द करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच घेताना व्यवसाय कर अधिकारी गजाआड झाले आहेत. स्नेहल सुनिल ठाकुर ( 52, रा. अश्विन नगर नाशिक) असे लाच घेतलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे
तक्रारदार यांची कल्पदीप इंडस्ट्रियल सेक्यूरिटी सर्विसेस ही कंपनी दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे कपंनीचा व्यवसाय कर रद्द व्हावा यासाठी त्यांनी 13 सप्टेंबर रोजी व्यवसाय कर अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. व्यवसाय कर रद्द करून द्यायच्या मोबदल्यात व्यवसाय कर अधिकारी स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून विभागाने सापळा रचला.
त्यानुसार बुधवारी (दि. 20) कार्यालयात पंचासमोर ठाकूर यांनी तक्रारदाराकडून तडजोड करीत चार हजार रुपयांची लाच घेतली. लाच प्रतिबंधक विभागाने ठाकूर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक विश्वजीत पांडुरंग जाधव, हवालदार प्रकाश डोंगरे, नाईक प्रणय इंगळे, शिपाई शितल सूर्यवंशी, हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.