मुलीचे पलायन करणाऱ्या कुटुंबीयांच्या घरासमोर आई-वडिलांचे झाले अंत्यसंस्कार
लाल दिवा : पांढुर्ली, तालुका सिन्नर येथून एक १९ वर्षीय मुलगी आपले आई – वडिलांसमोरच प्रियकराच्या मोटरसायकलवर बसून निघून गेली. सदरवेळी त्याठिकाणी उपस्थित असणारे मुलीचे आई-वडील तिला प्रियकरासोबत न जाण्याबाबत विनंती करत होते.
आपल्या मुलीने आपले न ऐकता ती प्रियकरासोबत निघून गेल्याचे दुःख आई-वडिलांना अनावर झाल्याने दोघांनीही सदर दिवशीच नाशिक शहरात रेल्वेखाली आत्महत्या केली होती.
प्रेतांचे उत्तरीय तपासणीनंतर सदरची प्रेते रेल्वे पोलिसांनी मयतांचे नातेवाईकांचे ताब्यात दिली होती. मयत आई-वडील हे दोघेही भरवीर तालुका इगतपुरी येथील रहिवासी असल्याने सदरची अंत्यसंस्कारासाठी गावात आणण्यात आली होती.
दरम्यान, मयत आई-वडिलांची मुलगी ज्या मुलाबरोबर निघून गेली, तो मुलगा देखील त्याच गावातील रहिवासी असल्याने मयताचे नातेवाईकांनी चिडून सदर मुलाचे घरासमोरच उपरोक्त दोन्ही प्रेतांवर अंतिम संस्कार केले.
सदर मुलीचे आई-वडिलांचे मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून, सदर मुलगा व त्याचे नातेवाईकांविरुद्ध पोलीस ठाणे सिन्नर येथे कलम ३०६, ३६६, ३४ भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री डवले हे करत आहेत.
त्याचप्रमाणे, मयत आई-वडिलांच्या नातेवाईकांनी त्यांचा अंतिम संस्कार विवक्षित ठिकाणी न केल्यावरून त्यांचे विरुद्ध घोटी पोलीस स्टेशन येथे कलम ४४७, २९७, १४३, १४७ भादविप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास या करत आहेत.