आता अधिकाऱ्यांनी वापर करावा मुमेंट रजिस्टरचा !
लाल दिवा -नाशिक ,ता.१२: (राजन जोशी) – नाशिक महानगरपालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिला नसल्याचे दिसत आहे. आयुक्त आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी विविध मीटिंगांच्या कारणाने व्यस्त असताना कर्मचारी वर्ग किंवा काही अधिकारी हे जागेवर उपस्थित राहत नसल्याने आता मुमेंट रजिस्टर चा वापर हा झालाच पाहिजे असे आदेश विभागीय आयुक्त तथा प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पारित केले आहे.
नाशिक महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे कोणाचाही कोणावर अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आयुक्तांना संपूर्ण शहराचे पालकत्व देण्यात आलेले असल्याने आयुक्त नाशिक मध्ये नसताना महानगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा जागेवर उपस्थित राहत नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी नगरसेवक किंवा विविध पदाधिकारी यांचा महापालिकेत वावर असल्यामुळे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना जागेवर उपस्थित राहणे बंधनकारक होते. परंतु सध्या आयुक्त हेच सर्वेसर्व असल्यामुळे आणि महापालिकेत नगरसेवक किंवा तस्तम पदाधिकाऱ्यांचा वावर बंद झाल्याने अधिकारी व कर्मचारी हे सैरावैर झाल्याचे दिसून येत आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांनी महापालिकेची ड्युटी करताना त्या वेळात बाहेर जाताना मोमेंट रजिस्टर चा वापर करावा असा आदेश आता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे.
विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशामुळे आता महापालिकेत खरंच काय बदल होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.