न्युक्लिअस बजेट योजनांच्या लाभासाठी 25 मे पर्यंत अर्ज करावेत -विशाल नरवाडे…..!
लाल दिवा -नाशिक, दिनांक : १२ कळवण आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील न्युक्लिअस बजेट योजने अंतर्गत मंजुर योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 15 ते 25 मे 2023 या कालावधीत अर्ज सादर करावेत, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी कळविले आहे.
न्युक्लिअस बजेट योजने अंतर्गत मंजुर योजनांच्या लाभासाठी यापूर्वी ज्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत, त्यांनी पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. तसेच ज्यांनी अर्ज सादर केलेले नाहीत त्यांनी 15 मे ते 25 मे 2023 या कालावधीत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण जिल्हा नाशिक येथे अर्ज सादर करावेत. योजनांचे अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळवण व गट विकास अधिकारी, सर्व पंचायत समिती कार्यालय येथे उपलब्ध आहेत. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असेही सहायक जिल्हाधिकारी श्री. नरवाडे यांनी कळविले आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
लाभार्थी अनुसूचित जमातीचा असल्याबाबतचा जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पुस्तकाची छायांकित प्रत, उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेचा दाखला (नजीकच्या एक वर्षाच्या आतील), अपंग, विधवा परितक्त्या असल्यास प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड, दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, यापूर्वी अन्य शासकीय विभागांकडून या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र इत्यादी.