महिला दिनानिमित्त पांडवलेण्यावर महिलांनी केले धाडसी सादरीकरण
सह्याद्री लव्हर्सचा महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा महिलांसाठी अभिनव उपक्रम
नाशिक (प्रतिनिधी) – ८ मार्च २०२५जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सह्याद्री लव्हर्स ट्रेकिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पांडवलेणी डोंगरावर महिलांसाठी विशेष रॅपलिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक आणि परिसरात वाढत्या ट्रेकिंग संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर, या शिबिरात सुमारे ३० महिलांनी सहभाग घेतला.
या शिबिरात ट्रेकिंगची ओळख, गिर्यारोहणासाठी आवश्यक साहित्य आणि त्याचे उपयोग, रॅपलिंग आणि क्लायंबिंग तंत्रे, तसेच डोंगररांगांमध्ये अपघात झाल्यास उपलब्ध साहित्याचा वापर करून बचावकार्य कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. घर, नोकरी आणि व्यवसाय सांभाळून ट्रेकिंगसारख्या धाडसी क्षेत्रात रस असलेल्या महिलांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला. पांडवलेण्यावर रॅपलिंग करणे हा त्यांच्यासाठी एक अनोखा अनुभव होता.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री श्रीकृष्ण देशपांडे यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी डोंगररांगांमध्ये विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या आपत्तींबाबत माहिती दिली आणि विविध प्रात्यक्षिकेही सादर केली. सह्याद्री आणि हिमालय ट्रेकमध्ये रस असणाऱ्या महिलांसाठी हे प्रशिक्षण शिबिर फारच उपयुक्त ठरले.
या शिबिरासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सह्याद्री लव्हर्स ट्रेकिंग ग्रुपच्या सौ. वंदना कुलकर्णी, चेतना शर्मा, विक्रम बेंडकुळे, दिनेश जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित महिलांना गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. या शिबिरात महिलांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करण्यात आले आणि भविष्यातील उपक्रमांची माहितीही देण्यात आली. सह्याद्री लव्हर्स ट्रेकिंग ग्रुपने या अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करून स्त्रीशक्तीचा जागर केला.