महिलांना महसूल कायदे साक्षर करण्यासाठी अभिनव उपक्रम
महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महसूल विभागाचा अभिनव प्रयत्न
वरखेडा, दिंडोरी (प्रतिनिधी) – ८ मार्च २०२५
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंडळ अधिकारी कार्यालय, वरखेडा, तालुका दिंडोरी यांच्यामार्फत “करू या महिलांना महसूल कायदे साक्षर” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असल्या तरी महसूल कार्यालयात जमिनीच्या व्यवहारांसाठी येणाऱ्या महिलांची संख्या अत्यल्प आहे, हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
राजकारण, सरकारी नोकरी, संरक्षण क्षेत्र, समाजसेवा अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु जमिनीचा सातबारा उतारा घेणे, शेतीविषयक अडचणी सोडवणे, कर्ज प्रकरणे अशा बाबींसाठी महसूल कार्यालयात येणाऱ्या महिलांची संख्या अद्यापही कमीच आहे. महिलांना महसूल कायद्याची माहिती मिळावी आणि त्या स्वतःहून आपले व्यवहार करू शकतील, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालयात आणि मंडळ अधिकारी कार्यालयात महिलांसाठी विशेष शिबिर आयोजित केले जाईल. या शिबिरात सातबारा बाबत शंका निरसन, सातबारा वितरण आणि मार्गदर्शन केले जाईल. ८ मार्च रोजी या उपक्रमाची औपचारिक घोषणा आणि उद्घाटन करण्यात आले.
शेतकरी बांधवांनी आपल्या कुटुंबातील महिलांना शेती कागदपत्रे आणि अभिलेखांबाबतचे कामकाज करण्यासाठी प्राधान्याने पाठवावे, असे आवाहन मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केले आहे. या उपक्रमामुळे जास्तीत जास्त महिला महसूल कायदे साक्षर होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आणि भगिनींनी या उपक्रमाला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्रीमती प्रीती अग्रवाल, मंडळ अधिकारी, वरखेडा आणि मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी केले आहे.