नाशिकमध्ये रोजीरोटीच्या लाथीचा अंजाम प्राणघातक!
कुटुंब उद्ध्वस्त, संभाजी चौकात हॉटेलचालकाचा खून
लाल दिवा-नाशिक,७:- – शहरातील संभाजी चौकात एका हॉटेलचालकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास नितीन शेट्टी (४०) या तरुणाच्या हॉटेलवर सहा जणांनी अचानक हल्ला केला. सकाळी आपल्या रोजीरोटीला लाथ मारल्याचा आरोप करत हल्लेखोरांनी चाकू, कोयत्याने हल्ला चढवला आणि शेवटी दगडाने डोक्यात घालून शेट्टींचा खून केला. हा सगळा प्रकार काही क्षणात घडला आणि हल्लेखोर गर्दी जमण्याआधीच पळून गेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे एकमेकांच्या ओळखीचे आणि घराच्या आसपासचेच आहेत. हल्ल्यानंतर संशयितांनी महेश शेट्टी यांच्या घरी दगडफेक करून त्यांच्या दुकानाचीही तोडफोड केली.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट एकचे पथक तातकाळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सहा संशयितांची नावे निष्पन्न केली आहेत आणि त्यांचा कसून शोध सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
शेट्टी यांचे नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. जोपर्यंत संशयित हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळे सिव्हिलमध्ये रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
- पोलिसांचा तत्पर तपास सुरू
घटनेनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयितांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे. लवकरात लवकर संशयितांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.