डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार: राज्यपाल, मुख्यमंत्री
चैत्यभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
लाल दिवा-मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) – “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून त्यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल,” असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेबांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असल्याचे सांगत राज्यपाल म्हणाले, “ते शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, पत्रकार, साहित्यिक, समाजसुधारक सर्वकाही होते. सामाजिक सुधारणांची दूरदृष्टी असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांचे कार्य, विचार, आदर्श नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करूया.”
डॉ. बाबासाहेबांनी जातीमुक्त समाजाचे स्वप्न पाहिले होते. अज्ञान, असमानता, दारिद्र्य यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य शिक्षणात असल्याने प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, विकासाची समान संधी मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. “शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा विचार देणाऱ्या बाबासाहेबांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिल परिसरात आकाराला येत आहे. हे स्मारक देशातीलच नव्हे, तर जगातील नागरिकांसाठी, विशेषतः युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला.
- देशाच्या प्रगतीचे श्रेय संविधानाला : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. “या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे. बाबासाहेब द्रष्टे, अभ्यासू व व्यासंगी व्यक्तिमत्व होते. सध्या देशाच्या प्रमुख नीती, धोरणांमध्ये बाबासाहेबांनी तेव्हा केलेल्या भविष्यातील संकल्पनांचा अंतर्भाव दिसून येतो.”
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले.