नाशिकमध्ये बँक कर्मचाऱ्याने २.१२ कोटींचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस!
- बनावट वारसदारांच्या माध्यमातून कोटींची लूट!
लाल दिवा-नाशिक,दि.३०:- (प्रतिनिधी) – पंजाब नॅशनल बँकेच्या कॅनडा कॉर्नर शाखेत हॉल इंचार्ज म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल २.१२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिपक मोतीलाल कोळी (वय ४०) या आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी लतिका मधुकर कुंभारे (वय ४०, रा. श्री तिरूमला लक्झरीया, पाईपलाईन रोड, सिरीन मेडोज, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२२ पासून आरोपी दिपक कोळी हा पंजाब नॅशनल बँकेच्या कॅनडा कॉर्नर शाखेत हॉल इंचार्ज म्हणून काम करत होता. त्याने आपल्या पदावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत, बनावट कागदपत्रे तयार करून १०६ विमाधारक बँक खातेधारकांचे बनावट वारसदार दाखवले. या बनावट वारसदारांच्या नावावर बँकेत खाती उघडून, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेतील दाव्याची रक्कम त्या खात्यांवर वर्ग केली. अशा प्रकारे त्याने एकूण २ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बँकेची, एलआयसीची आणि मृत खातेधारकांच्या खऱ्या वारसदारांची फसवणूक केली आहे. आरोपी दिपक कोळी हा रा. फ्लॅट नं. १०१, भारद्वाज रेसीडन्सी, बेडे कॉलनी, भुजबळ फार्म, नाशिक येथे राहतो. त्याला २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७:३४ वाजता अटक करण्यात आली.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९८/२०२४ अंतर्गत कलम ३१६(५), ३१८(४), ३१९(१), ३३६(२), ३३८, ३३६(३), ३४०(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चव्हाण (गुन्हे) हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा पूर्वीचा कोणताही गुन्हाईत इतिहास नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि आरोपीने आणखी कोणाला फसवले आहे का, याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.