करोडोचा मुद्देमाल जप्त! नाशिक ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई
7.82 कोटींचा मुद्देमाल जप्त, कोण आहेत यामागे?
लाल दिवा-नाशिक,दि.१८ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई करत तब्बल 7.82 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १५ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या आचारसंहितेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
- गुन्हेगारांना हद्दपार, अवैध शस्त्रे जप्त
पोलिसांनी ४८ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केले असून, दोघांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर १४ देशी पिस्तुले, ३७ जिवंत काडतुसे, ४३ तलवारी, ९ कोयते आणि अनेक चाकू जप्त करण्यात आले आहेत. बॉम्बे पोलीस कायद्याअंतर्गत ५३८८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
- दारू, गुटखा, ड्रग्जवर टाच
पोलिसांनी १.४४ कोटी रुपयांचा अवैध दारूचा साठा जप्त करत ११९१ गुन्हे दाखल केले आहेत. ९३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून ५२ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच २६ लाखांचे ड्रग्ज जप्त करून ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्यांमध्ये वापरलेली २.४६ कोटींची वाहने आणि २.२२ कोटींची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
- प्रचार थांबल्यानंतर बाहेरील कार्यकर्त्यांना बंदी
२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रचार संपल्यानंतर संबंधित मतदारसंघाचे मतदार नसलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना मतदारसंघात राहण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई केली जाईल.
- सीसीटीव्ही आणि ड्रोनचा वापर
निवडणुका निष्पक्ष आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस वाहनांवर ११० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.