नाशिकमध्ये ८५ लाखांची केळी निर्यात फसवणूक; पाच आरोपींचा शोध सुरू
केळी निर्यात फसवणूक प्रकरणी पोलिस तपास सुरू
लाल दिवा-नाशिक,दि.३:-(प्रतिनिधी): कराड अॅग्रो एक्सपोर्ट कंपनीच्या मालकाची तब्बल ८५ लाख २३ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बनावट कंपनी उभारून इराणमध्ये केळी निर्यात करण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फिर्यादी राहुल विलासराव कराड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत आरोपी आबिद रझा मीर आणि त्याच्या साथीदारांनी त्यांची फसवणूक केली. आबिद रझा मीर याने ‘किहान अख्तर किरदार’ नावाची बनावट कंपनी तयार करून फिर्यादींना इराणमध्ये केळी निर्यातीचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादींकडून सात कंटेनर केळी घेतल्यानंतर आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि उडवाउडवीची उत्तरे दिली.
याप्रकरणी अंबड पोलिसांनी आबिद रझा मीर (वाशी, नवी मुंबई), हमीद उस्मान खान (सुमाया एंटरप्रायझेस), दिलीपकुमार रमेशचंद विग, फारवा रझा उर्फ फरवा फतिमा आणि कबीर शहा बकरी या पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ४६५, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे हे प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिली असून पोलीस उपनिरीक्षक घुनावत यांनीही घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सुरू आहे.