भुजबळांविरुद्ध घोडके यांचा बंड: ओबीसी अस्मितेचा लढा की राजकीय खेळ?

घोडके यांचा भुजबळांना डाव: येवलेच्या राजकारणात नवे वळण

लाल दिवस -नाशिक,दि.२३:-नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओबीसींचे मसीहा मानले जाणारे छगन भुजबळ यांच्याविरुद्ध त्यांचेच निकटवर्तीय मानले जाणारे गजू घोडके यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. येवला मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी जाहीर करत घोडके यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

घोडके यांचा हा निर्णय एकाच दिवसात घेतलेला नाही. ओबीसी समाजातील बारा बलुतेदारांच्या प्रश्नांवर आवाज उठवत त्यांनी यापूर्वीही अनेकदा आंदोलने केली आहेत. मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करत त्यांनी आपल्या आक्रमकतेचे दर्शन घडवले होते. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जारंगे पाटील यांच्याशीही त्यांचा वारंवार संघर्ष झाला आहे.

घोडके यांचा हा निर्णय ओबीसी समाजातील दुर्लक्षित घटकांच्या मनातील खदखद उघड करतो. विधान परिषदेत, महामंडळांमध्ये, अगदी व्यासपीठांवरही त्यांच्या मते बारा बलुतेदारांना डावलले जाते. नेहमी दुसऱ्यांच्या सोयीसाठी वापरले जाणे, दुय्यम वागणूक मिळणे यामुळे त्यांच्या मनात असंतोष पसरला आहे.

या पार्श्वभूमीवर घोडके यांची उमेदवारी केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी नसून ती ओबीसी अस्मितेचा लढा असल्याचे दिसून येते. मात्र, या लढाईत त्यांना किती यश मिळते हे येणारा काळच ठरवेल. त्यांच्या या निर्णयामुळे येवलेतील राजकीय समीकरणे नक्कीच बदलतील यात शंका नाही. त्यामुळे ही लढाई केवळ घोडके विरुद्ध भुजबळ नसून ओबीसी समाजातील अंतर्गत गटांमधील सत्ता संघर्षाचे रूप घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!