रक्ताळलेल्या हाताने लिहिलेला कायद्याचा धडा!
नागरिकांच्या रक्षणासाठी, स्वतःच्या जीवाची बाजी
लाल दिवा-नाशिक,दि.५ :- पंचवटीत रात्रीच्या अंधारात एका बहादुर पोलीस अधिकाऱ्याने मृत्यूला सामोरे जात, चाकू फिरवणाऱ्या गुंडाचे पंख छाटले! मध्यवर्ती गुन्हे शाखेतील ASI नामदेव सोनवणे हे कर्तव्यावरून घरी परतत असताना, दिंडोरी नाक्याजवळ त्यांना दिसला एक भयानक देखावा. रेकॉर्डवरील गुन्हेगार विक्की जाधव उर्फ गट्टया हा चाकू घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत होता.
जिवाची पर्वा न करता सोनवणे यांनी आपले वाहन थांबवले आणि विक्कीला आव्हान दिले. विक्कीने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत हल्ला केला. सोनवणे यांच्या पोटात चाकूची धार लागली, रक्त वाहू लागले पण त्यांनी हार मानली नाही! त्यांनी अविरतपणे विक्कीचा पाठलाग करत त्याला पकडले आणि पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले.
हातावर कर्तव्याचे रक्त, आणि छातीतून निघणारी रक्ताची धार… ASI सोनवणे यांनी दाखवून दिले की कायद्याचे रक्षक कोणत्याही परिस्थितीत मागे हटत नाहीत! पोलीस दलासह संपूर्ण शहर त्यांच्या या अतुलनीय धाडसाचे कौतुक करत आहे…