मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा बीडमधून जेरबंद; अनुयायांकडून कठोर कारवाईची मागणी
सोशल मीडियावरून बदनामी करण्याचा प्रयत्न फसला, आरोपी गजाआड
लाल दिवा-नाशिक,दि.२ : – राज्याचे अन्न व पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या इसमाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. रविंद्र यशवंत धनक (रा. साई श्रद्धा कॉलनी, पाथर्डी फाटा, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी आहे.
दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६४३/२०२४ अंतर्गत भादंवि कलम २९६, ३५१ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भुजबळ हे आपल्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच मागासवर्गीय, शोषित, वंचित आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणत असतात. त्यामुळे अशा व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास कठोर शासन करावे, अशी मागणी त्यांचे अनुयायी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नाशिकचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने काम सुरू केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपी हा बीड जिल्ह्यातील आष्टी येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला आष्टी येथून ताब्यात घेतले.
पोलीस कोठडीत आरोपीने गुन्हा कबूल केला असून, न्यायालयाने त्याला दि. ०३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, राम बर्डे, आप्पा पानवळ, सुकाम पवार, शरद सोनवणे, जगेश्वर बोरसे, धनंजय शिंन्दे, रमेश कोळी, समाधान पवार, मुक्तार शेख यांनी ही कारवाई केली.