भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर निबंध स्पर्धा: जिल्हाधिकारी यांचे आवाहन
लाल दिवा नाशिक,ता.२१ : भगवान महावीर स्वामी २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
या निबंध स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य आणि जिल्हा स्तरावर रोख स्वरूपात आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.
राज्यस्तरावरील स्पर्धेत प्रथम पारितोषिक ₹३,३३,३३३, द्वितीय पारितोषिक ₹२,२२,२२२ आणि तृतीय पारितोषिक ₹१,११,१११ इतके असेल. तर जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक ₹५,५५५, द्वितीय पारितोषिक ₹३,३३३, तृतीय पारितोषिक ₹२,२२२, चतुर्थ पारितोषिक ₹१,१११ आणि पाचवे पारितोषिक ₹५५१ इतके असेल.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या अधिपत्याखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. या निबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन कार्याची ओळख होईल,
असा विश्वास जिल्हाधिकारी शर्मा यांनी व्यक्त केला.