नाशिक हादरले! दिवसाढवळ्या कर्मचाऱ्याला चोरांनी लुटले, साडेचार लाखांसह दुचाकी गेली!
पंचवटीत दिवसाढवळ्या भयंकर लूट; दुचाकीसह साडेचार लाखांचा ऐवज लंपास
लाल दिवा पंचवटी, नाशिक, दि. 19 शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा उचल खात असल्याचे दिसून येत आहे. दिवसाढवळ्या रोकड रक्कम घेऊन जाणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अडवून त्याच्याकडून दुचाकीसह 4 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पंचवटीतील गणेशवाडी सुलभ शौचालयाजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बाबुलाल सोळंकी (वय ५८, रा. ऋषीकेश अपार्टमेंट, मधुबन कॉलनी, पंचवटी) यांनी याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सोळंकी हे नानावली येथील प्रशांत मार्केटींग, प्रशांत डिस्ट्रीब्युटर्स, जहांगीर मंगल कार्यालयात नोकरी करतात.
सोमवारी (दि.१८) सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते. दुपारी साडेअकराच्या सुमारास त्यांचे मालक प्रफुल्ल जैन यांनी त्यांना 4 लाख 17 हजार रुपये रोख रक्कम देत शरणपूर रोडवरील डीबीएस बँकेत जमा करण्यास सांगितले.
सोळंकी हे दुचाकीवरून (एमएच १५ सीएफ १२१४) बँकेत जात असताना गणेशवाडी येथील सुलभ शौचालयाजवळ पोहोचले. त्याचवेळी फराण खान मुदस्सर खान (वय १९, रा. पंचशीलनगर)आणि राशिद नावाच्या दोन इसमांनी त्यांना अडवले आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने रोकड रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. तसेच त्यांची दुचाकीही घेऊन ते पसार झाले. या प्रकरणी सोळंकी यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सपोनि विलास पडोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक गुन्हेगारांचा शोध घेत आहे. घटनास्थळालगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.