धाडसी पाठलागाअंती गांजा तस्कर गजाआड; नाशिक पोलिसांची कामगिरी वाखाणण्याजोगी
२८ किलो गांजासह तस्कर गजाआड
लाल दिवा-नाशिक,दि.७: – नाशिक शहर पोलीस दलाच्या आडगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने धाडसी पाठलाग करून एका गांजा तस्करास जेरबंद केले असून, त्याच्या ताब्यातून २८ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना ७ जानेवारी २०२५ रोजी पहाटे २:३० वाजताच्या सुमारास घडली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘स्टॉप अँड सर्च’ अभियानाअंतर्गत आडगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी नवव्या मैलावर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी लाल रंगाच्या मारुती एसएक्स४ (एमएच ०२ जेपी ०१२३) या वाहनाच्या चालकाने पोलिसांना पाहून वाहन न थांबवता पोलीस कर्मचाऱ्यांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस कर्मचारी वेळीच बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळताच नियंत्रण कक्षातून इतर पोलिस वाहनांना सावध करण्यात आले आणि संशयित वाहनाचा पाठलाग सुरू झाला. या थरारक पाठलागात आठ पोलिस वाहने सहभागी होती. संशयित वाहनाने पोलिसांच्या चार वाहनांना धडकही दिली. सुमारे दोन ते तीन तास आणि २५ किलोमीटरचा चित्तथरारक पाठलाग करून अखेर पोलिसांनी संशयित वाहन अडवले.
यावेळी वाहनातील पाच पैकी चार आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले, तर एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडला. वाहनाची झडती घेतल्यावर त्यात २८ किलो गांजा आढळून आला.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित केले. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.