गोंदेत भ्रष्टाचाराचा धुरळा! ७५,००० ची लाच मागणारा माजी सरपंच अखेर जाळ्यात..!
हॉटेल परवानगीच्या मोबदल्यात ७५,००० ची मागणी! धाडसी तरुणाच्या तक्रारीवरून माजी सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल
लाल दिवा-नाशिक,दि.२१ प्रतिनिधी: सिन्नर तालुक्यातील गोंदे गावातील माजी सरपंच अनिल दौलत तांबे यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हॉटेल व्यवसायासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात त्यांनी ७५,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणाने गोंदे गावात हॉटेल आदित्य या नावाने परमिट रूम आणि बियरबार सुरू करण्यासाठी गोंदे ग्रामपंचायतीकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. तक्रारदाराचा आरोप आहे की, तांबे यांनी त्याच्याकडून हे प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतःसाठी आणि ग्रामसेवक भणगीर यांच्यासाठी ७५,००० रुपयांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची दखल घेत विभागाने सापळा रचला. मात्र, तांबे यांनी कोणतीही रक्कम स्वीकारली नाही. तरीही, तक्रारदाराच्या तक्रारीवरून सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये तांबे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ आणि ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील करत असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे आणि पोलीस हवालदार सुनील पवार यांचा समावेश होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.